घोडेश्वरी मंदिर, घोडेगाव

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • घोडेश्वरी मंदिर, घोडेगाव
    प्राचीन काळापासून भारतात देवीची उपासना केली जात आहे. देवीचे मूळ स्वरूप निर्गुण असले तरी, तिच्या सगुन रूपाची उपासना करण्याची परंपरा प्रचलित आहे. हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते. शक्ती विना पुरुषाचे अस्तित्व नाही. त्यामुळेच जितके महत्त्व देवांना आहे, तितकेच महत्त्व देवीला सुद्धा आहे. भारतामध्ये अनेक संप्रदाय आहेत जसे गणपत्य, सौर्य, दत्त, शाक्त इत्यादी. त्यापैकी शाक्त म्हणजे प्रामुख्याने देवीची अर्थात शक्तीची उपासना करणारा समुदाय. शाक्त संप्रदायाचे अस्तित्व भारतात प्राचीन काळापासून आहे.
    नगर शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर घोडेगाव नावाचे एक छोटीसे परंतु संपन्न असे गाव आहे. घोडेगाव हे नाव ऐकल्यावर या गावाचा आणि घोड्यांचा काही जवळचा संबंध असावा असे वाटते, पण प्रत्यक्षात असे काही नाही. ही कहाणी जाणून घ्यायची असल्यास आपल्याला गावातील श्रद्धास्थान असलेले घोडेश्वरी देवस्थानाच्या इतिहासात डोकावणे आवश्यक ठरते. घोडेश्वरी देवी मंदिराला भेट दिली असता तेथील भाविकांकडून एक आख्यायिका समजली. असे म्हणतात, 1000 वर्षांपूर्वी या गावाचे नाव वेगळेच होते. गावाजवळच एक नदी आहे, परंतु ती फक्त पावसाळ्यातच प्रवाहित होत असे. त्यामुळे या गावात कायमच पाण्याचे दुर्भिक्ष असायचे. गावकऱ्यांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असे.
    एकदा सर्वांनी ठरविले की सर्वजण मिळून एक विहीर खोदावी, जेणेकरून आपला पाणी प्रश्न सुटेल. गावातील सर्वांनी अपार कष्ट घेत दहा परस खोलीची विहीर खोदली. परंतु एक थेंब पाणी सुद्धा त्या विहिरीला लागले नाही. सर्व कष्ट व्यर्थ गेल्यामुळे गावकऱ्यांना नैराश्य आले. ज्या गावात पाणी नाही त्या गावाचा त्याग करावा असे विचार त्यांच्या मनात तरळू लागले.
    गावातील रेणुका माता मंदिराजवळ एक संत महात्मे आराधना करीत होते. त्यांनी गावकऱ्यांना प्रोत्साहित करत, मंदिराशेजारीच एक नवी विहीर खोदण्याचा सल्ला दिला. त्या महात्म्यांवरील श्रद्धेपोटी, रेणुका मातेचा आशीर्वाद घेत, सर्वांनी नवी विहीर खोदण्यास प्रारंभ केला. बरेच कष्ट घेत सहा परस खोदकाम झाल्यावर, त्यांना एक घोड्याच्या आकाराची मूर्ती सापडली. ती मूर्ती त्यांनी मंदिरात ठेवली. विहिरीत अजूनही पाणी न लागल्याने निराशा होतीच. त्या रात्री सर्वजण झोपल्यावर ग्रामप्रमुखाच्या स्वप्नात एक दृष्टांत झाला. एक दिव्य आकृती त्यांना म्हणाली की, "मी घोडेश्वरी देवी आहे. विहिरीत सापडलेल्या माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करा. त्यानंतर पुन्हा विहीर पुढे खोदण्यास सुरुवात करा. भरपूर पाणी लागेल. गाव सोडू नका. या गावाची कीर्ती भविष्यात सर्वदूर पोहोचेल."
    सकाळी उठल्यावर ग्रामप्रमुखांनी हा दृष्टांत सर्व गावकऱ्यांना सांगितला. सर्वांमध्ये उत्साहाचा संचार झाला. घोडेश्वरी देवीच्या स्वयंभू पाषाणमूर्तीची भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठापना केली गेली. देवीचा आशीर्वाद घेऊन पुन्हा विहीर पुढे खोदण्यास सुरुवात केली, आणि काय आश्चर्य एक परस खोलीवरच विहिरीत पाण्याचा जिवंत झरा सापडला. सगळीकडे जल्लोष केला गेला. गावाचा पाणी प्रश्न कायमचा सुटला. घोडेश्वरी देवीच्या आशीर्वादाने हे शक्य झाले, म्हणून मंदिराचे नाव घोडेश्वरी मंदिर तर गावाचे नाव घोडेगाव असे झाले. आजही मंदिराच्या आवारात आपल्याला ही विहीर दिसते. या विहिरीच्या पाण्याने अंघोळ केली असता असाध्य त्वचारोग सुद्धा पूर्ण बरे होतात अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.
    मूळ मंदिर हेमाडपंथी होते. आता मंदिराचा सिमेंट काँक्रीटने जीर्णोद्धार केलेला आहे. त्यामुळे मंदिराचे पुरातन स्वरूप लोप पावले असून त्याचे आधुनिक रूपांतरण झालेले आहे. मूळ मंदिराचा फक्त गाभाराच शिल्लक आहे. प्राचीन मंदिरे आपली संस्कृती वारसाकेंद्रे आहेत, त्यांचा जिर्णोद्धार करताना त्यांचे मूळ स्वरूप टिकले पाहिजे, असा प्रयत्न केला गेला पाहिजे, हे माझे वैयक्तिक मत आहे.
    तसे, आत्ताचे जीर्णोधारित मंदिर सुद्धा छान आहे. मंदिराच्या सर्व बाजूंनी संरक्षक भिंत बांधली असून, विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत. परिसर स्वच्छ आणि हिरवागार आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर तसेच प्रवेशद्वारावर, आपल्या संस्कृतीशी ओळख करून देणारी उत्तम कारागिरी केलेली आहे. शेषशायी विष्णू, शिवपार्वती, गणेश, वारकरी अशा अनेक कलाकृती आपले लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आवारातच एक छोटेसे शिवालय असून दोन भव्य दीपमाळा सुद्धा आहेत. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. मुख्य गाभारा हा जुनाच दगडी बांधकामातील असून आत आपल्याला दोन देवींचे तांदळे दिसतात. त्यातील एक रेणुका माता व एक घोडेश्वरी माता आहे. येथे वर्षातून दोन वेळेस यात्रा भरते. चैत्र कृष्ण पंचमीला एप्रिल महिन्यात एक मोठी यात्रा असते. यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून येथे कुस्त्या लढविण्यासाठी मल्ल येतात. तसेच शारदीय नवरात्र उत्सव सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
    घोडेगाव हे नाव का पडले ? या संदर्भात एक आख्यायिका मच्छिंद्रनाथांशी सुद्धा जोडलेली आहे. त्याची कहाणी पुन्हा कधीतरी.
    विशाल लाहोटी
    संस्थापक, धरोहर.
    ‪@trekkampdiscoverunknown794‬

Komentáře • 3