परमानंद स्वामी मठ, खेडले परमानंद

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • अहमदनगर जिल्ह्याची भूमी ही अनेक थोर महापुरुषांच्या सहवासाने प्रगल्भ झालेली आहे. अगदी प्राचीन काळापासून ते शिवकालापर्यंत मोठा इतिहास या प्रदेशाला लाभला आहे. नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील 'खेडले परमानंद' हे एक छोटेसे गाव आहे. मुळा नदीच्या किनारी वसलेल्या या गावाची मर्यादित लोकसंख्या आहे. ' शिवभारत ' या संस्कृत ग्रंथाचे रचयता स्वामी परमानंद यांचे हे जन्मस्थळ आहे. या ग्रंथात एकूण 32 अध्याय आहेत. मालोजी राजे, शहाजीराजे यांच्या कारकिर्दी पासून ते शिवछत्रपतींच्या दक्षिण-कोकण विजयापर्यंतचा इतिहास या ग्रंथात नमूद केलेला आहे. शिवभारत या ग्रंथाच्या आधारेच शिवजन्माची 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली गेली. शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटी दरम्यान कवींद्र स्वामी परमानंद हे त्यांच्या समवेत होते.
    परमानंद स्वामींना स्थानिक लोक कवींद्र परमानंद नेवासकर म्हणून सुद्धा ओळखतात. संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारे परमानंद स्वामी यांना वेदांचे, पुराणांचे सखोल ज्ञान होते. मुळा नदी किनारी सोळाशे सालच्या कालखंडात घनदाट अरण्य होती आणि येथेच परमानंद स्वामींचा आश्रम होता. आपल्या काही शिष्यगणांसोबत स्वामी येथे साधना करीत असत. आजही येथे भेट दिली असता येथील अध्यात्मिक शांततेची आपल्याला प्रचिती येते.
    काही दिवसांपूर्वी या ठिकाणाला भेट देण्याचे भाग्य लाभले. खेडले परमानंद गावात पोहोचल्यावर अगदी सहज मठापर्यंत जाता येते, एक पक्की सडक गावातून या मठापर्यंत जाते. गावातून मुळा नदीपर्यंत पोहोचताच आपल्याला या प्रशस्त मठाचे दर्शन घडते. सध्या पडझड झालेल्या अवस्थेत असून सुद्धा या गढी च्या मूळ स्वरूपाचा अंदाज आपल्याला येतो. असे कळाले की पूर्वी गढीला मोठी कमान होती, परंतु १९६४ साली झालेल्या भूकंपात मुख्य कमान कोसळली. काळाच्या ओघात आणि आपल्या वारसास्थळांच्या प्रति असलेली उदासीनता यामुळे तटबंदी सुद्धा नाहीशी झाली, तटबंदीचे काही अवशेष आपल्याला येथे आढळून येतात. सध्या मठाला एक मोठा जुना लाकडी दरवाजा दिसतो. दरवाज्याच्या मागे द्वार बंद करण्यासाठी वापरात असलेली आगळ सुद्धा सुस्थितीत दिसते. मुख्य दरवाजातून आज प्रवेश केल्यावर अगदी समोरच उजव्या बाजूला एक जुने शिवमंदिर दिसते. या शिवमंदिरात शिवलिंगाची नित्य पूजा होत असते. या शिव मंदिरा बाहेरच दोन अज्ञात व्यक्तींच्या समाधी आहेत. पुरातन मंदिरांचे भग्न अवस्थेतील स्तंभ, मुर्त्या आणि इतर काही अवशेष सर्वत्र विखुरलेले दिसतात. शिव मंदिरासमोरच परमानंद स्वामींचे समाधी स्थान आहे. मुख मंडपाच्या आत असलेल्या दगडी चौकटीतून प्रवेश केला की एक प्रशस्त सभा मंडप दिसतो. तेथेच बाजूला एका अतिशय अरुंद जागेतून आत गेल्यावर परमानंद स्वामींची समाधी दिसते. सद्यस्थितीत या जागेची खूप पडझड झालेली आहे त्यामुळे ताडपत्री लावून ही जागा थोडी सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. समाधीच्या बाजूलाच आपल्याला दगडामध्ये कोरलेला एक दीपस्तंभ दिसतो. समाधी कक्षामध्ये स्त्रियांना प्रवेश वर्जित आहे. समाधीकक्षाच्या बाहेरच परमानंद स्वामींच्या उपासनेची जागा आहे.
    सभा मंडपाच्या बाहेर आल्यावर प्रांगणात मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली एक छोटे मंदिर दिसते, परमानंद स्वामींच्या तीन शिष्यांची येथे समाधी आहे. याच झाडाखाली आपल्याला जवळपास चार फूट व्यासाचे धान्य दळण्याचे दगडी जाती दिसून येते तसेच एक मोठा वरवंटा सुद्धा दिसतो. त्यामुळे पूर्वी येथे एखादे मोठे धार्मिक स्थळ असावे आणि तेथे नित्य अन्नदान आदी कार्यक्रमांचे आयोजन होत असावे असे वाटते.
    गढीच्या वर गेल्यावर विटांचे सुंदर बांधकाम आपले लक्ष वेधून घेते. येथून दिसणारा मुळा नदीचा विस्तीर्ण प्रदेश विलोभनीय आहे. अध्यात्मिक साधनेसाठी ही जागा अतिशय योग्य आहे. संपूर्ण मठ हा दगड आणि विटांपासून बांधलेला आहे.
    स्थानिक लोकांबरोबर जाणून घेत असताना या मठाविषयी एक आख्यायिका कळाली. असे म्हणतात, एकदा शहाजीराजे त्यांच्या 2000 सैनिकांसमवेत या प्रदेशातून प्रवास करीत होते. घनदाट करण्याचा हा नदीकाठचा प्रदेश रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांना योग्य वाटला. त्यांनी सैनिकांना सांगितले की बघा आजूबाजूला आपल्या जेवणाची सोय होऊ शकते का ? तेव्हा त्यांना स्वामी परमानंद त्यांच्या शिष्यगणांसोबत सहित येथे उपासना करताना दिसले. परमानंद स्वामींनी शहाजीराजांना त्यांच्या फौज फाट्यासहित भोजनाचे आमंत्रण दिले. शहाजीराजे म्हणाले, " स्वामी, या निर्भीड अरण्यात तुम्ही इतक्या लोकांची सोय कशी करणार ? नका तसदी घेऊ. " यावर परमानंद स्वामींनी स्मितहास्य करीत शहाजीराजेंना निश्चिंत रहा असे सांगितले. परमानंद स्वामींनी सर्वांच्या भोजनाची सोय केली, सर्व सैनिक पोटभर जेवून सुद्धा अन्न शिल्लक होते. काही क्षणांमध्ये इतक्या लोकांची जेवणाची व्यवस्था केल्यामुळे शहाजीराजेंना परमानंद स्वामींच्या सिद्धीची प्रचिती आली. नंतर काही काळाने ऋणानुबंध जपत शहाजीराजांनी परमानंद स्वामींसाठी ही प्रशस्त गढी उभारली.
    ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या वास्तूबद्दल जास्त माहिती उपलब्ध नसल्याकारणाने सर्वांचेच खूप दुर्लक्ष झाले. आजही गावात अनेक पुरातन देवी देवतांच्या मुर्त्या, मंदिरांचे अवशेष आढळून येतात. ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती सभापती श्री सुनील गडाख यांच्या प्रयत्नाने तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने या मठाला आणि परिसराला भारतीय पुरातत्व विभागाकडून ' क ' वर्ग दर्जा दिला गेला आहे. या वारसा स्थळाच्या जतन आणि संवर्धनासाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे.
    स्वामी परमानंद मठ आणि परिसर नगर जिल्ह्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. हा विकास या जागेचे मूळ सौंदर्य जपत झाला पाहिजे हीच अपेक्षा आहे. येणाऱ्या पिढीला या ऐतिहासिक वास्तूंचा परिचय करून देणे हे आपले कर्तव्य आहे.
    - विशाल लाहोटी
    संस्थापक, Trekkamp धरोहर.
    ‪@trekkampdiscoverunknown794‬
    #paramanandswami #khedaleparamanand

Komentáře • 3

  • @chandrakantgosavi1011
    @chandrakantgosavi1011 Před 9 měsíci +1

    महत्वाची माहिती आहे नवीन पिढीसाठी अनमोल माहिती

  • @ganeshgagare1725
    @ganeshgagare1725 Před 9 měsíci +1

    ऐतिहासिक माहिती दिल्या बद्दल धन्यवाद राहुरी कारखाना

  • @cscmabharatsir
    @cscmabharatsir Před rokem

    Nice